व्यवस्था कशी बदलावी,
हे सांगायचे धाडस करणारी
--: अ र्थ क्रां ती :--
जो तो म्हणतो आता व्यवस्था बदलली पाहिजे, मात्र नेमके काय बदलेले पाहिजे, हे कोणी सांगत नाही. प्रश्नांची जंत्री उभी केली जाते, मात्र उत्तरे सांगितली जात नाहीत. अर्थक्रांती प्रतिष्ठान आपल्या पाच प्रस्तावांद्वारे व्यवस्थेत नेमके काय बदलले पाहिजे, हे सांगते. व्यवस्था बदलली पाहिजे, असे म्हणणार्या प्रत्येकाने म्हणूनच अर्थक्रांती समजून घेतली पाहिजे.
काळ्या पैशाच्या रोगावरचे अर्थक्रांती हे सर्वात प्रभावी औषध यासाठी आहे की काळ्या पैशाची निर्मिती अर्थक्रांती थांबविते. स्वीस बँकेतला पैसा भारतात कधी येईल, स्वीस बँकेत किती पैसा आहे, आपल्या देशात सध्य किती काळा पैसा आहे, हे आज सरकार आणि इतर कोणी- अगदी अर्थतज्ञही सांगू शकत नाही. त्यामुळे खात्रीचा मार्ग हा आहे की तो तयारच होणार नाही, असेच प्रयत्न करायला हवेत.
अर्थक्रांती प्रस्ताव:
1. सध्या अस्तिवात असलेली करप्रणाली (केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनचे सर्व कर) पूर्णतः रद्द करणे. (आयात कर अथवा कस्टम ड्यूटी वगळता) देशातील सर्व म्हणजे केंद्र, राज्य आणि पालिकांचे. असे सुमारे 32 कर सध्या आपण भरतो, भ्रष्टाचाराची सुरवात या करप्रणालीतील किचकटपणातून होते.
2. सरकारी महसूलासाठी फक्त ‘बँक व्यवहार कर’ ‘Bank Transaction Tax’ हा सिंगल पॉईंट डिड्क्शन टॅक्स लागू करणे. बॅंकेद्वारे होणार्या प्रत्येक व्यवहारावर एका निश्चित प्रमाणात वजावट करणे, (उदा.2 ट्क्के प्रती व्यवहार) वजावट फक्त जमा खात्यावरच (रिसीव्हींग एन्ड अकौंट्लाच) व्हावी, ही 2 टक्के वजावट निश्चित प्रमाणात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन व त्या विवक्षित बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. (उदा.0.70 ट्क्के केंद्र सरकार, 0.60 ट्क्के राज्य सरकार, 0.35 टक्के स्थानिक प्रशासन संस्था व 0.35 टक्के तो व्यवहार पूर्ण करणारी बँक)
3. सध्या चलनात असलेल्या रू.50 पेक्षा जास्त दर्शनी मूल्य असलेल्या चलनाचे उच्चाटन करणे. (यामुळे लोकांना बँकेमार्फतच व्यवहार करणे सोयीचे होईल. परिणामी शासनाच्या महसुलात लक्षणीय वाढ होईल) काळया पैशाचा राक्षस उभा करणार्या मोठया नोटा (100,500,1000 रू.) चलनातून काढून टाकण्यात येतील. जगात बहुतांश प्रगत देशांमध्ये अशा मोठया नोटा नाहीत. त्यामुळे तेथे भारतात होतात तसे रोखीने मोठे व्यवहार होत नाहीत.
4. शासनाची काही विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता अपेक्षित (जसे रू.2000 पर्यंतचे व्यवहार). अर्थातच या मर्यादेपुढील रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर संरक्षण मिळू शकणार नाही. (अशा रोख व्यवहार मर्यादा निश्चितीकरणामुळे बँक व्यवहारास चालना मिळून शासकीय महसुलात लक्षणीय वाढ अपेक्षित)
5. रोखीच्या कुठल्याही व्यवहारावर ‘बँक व्यवहार कर’(‘Bank Transaction Tax’) लागू असणार नाही.
सोप्या शब्दांत अर्थक्रांतीचे काही पैलू :--
- अर्थक्रांती म्हणजे सर्वांनी बँकमनी वापरणे. विकसित देशांत जसे सर्व व्यवहार बँकेद्वारा होत असल्याने व्यवहारांत पारदर्शकता निर्माण होते, ती भारतातही निर्माण करणे.
- अर्थक्रांती म्हणजे घरात पडून असलेला काळा पैसा व्यवहारात वापरात आणून त्याच्या आधारे देशात संपत्तीचे निर्माण करणे.
- अर्थक्रांती म्हणजे करपद्धतीतील गुंतागुंत काढून आनंदाने कर भरावे वाटतील, अशी व्यवस्था निर्माण करणे.
- अर्थक्रांती म्हणजे सध्या जगताना सर्वांनाच ज्या असुरक्षिततेने ग्रासले आहे, तिला मूठमाती देवून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात काम करणे.
- अर्थक्रांती म्हणजे राजकारणाला पांढरा पैसा देणे आणि राजकारणातील काळ्या पैशाचा नायनाट करणे.
- अर्थक्रांती म्हणजे प्रशासनात सुधारणा घडवून आणणे आणि त्यामुळे सूकर होणार्या आयुष्याचा आनंद घेणे.
- अर्थक्रांती म्हणजे सरकारला विकासकामांसाठी भरपूर महसूल देणे आणि त्यामाध्यमातून रोजगारसंधींना चालना देणे.
- अर्थक्रांती म्हणजे परकीय भांडवलाची गरज संपवून देशातच घराघरात पडून असलेले भांडवल बाहेर काढणे.
- अर्थक्रांती म्हणजे 1, 2, किंवा जास्तीत जास्त 3 टक्के व्याजाने घर, उद्योग आणि शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करणे,
- अर्थक्रांती म्हणजे ज्याची आर्थिक उलाढाल अधिक आहे, त्याला त्याप्रमाणात कर भरण्यास भाग पाडणे.
- अर्थक्रांती म्हणजे भेदभाव आणि अन्याय करणारा व्यवस्थेतील मानवी हस्तक्षेप कमी करून ‘रांगेचा फायदा सर्वांना होतो’, यावरचा विश्वास वाढीस लावणे.
- अर्थक्रांती म्हणजे गरीबातल्या गरीबाला मानवी प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची संधी देणे आणि श्रीमंतांना प्रामाणिकपणे संपत्ती निर्मितीची प्रेरणा देणे.
- अर्थक्रांती म्हणजे 121 कोटी भारतीयांना शांत, समृद्ध आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याचा हक्क मिळवून देवून जगासमोर आदर्श जीवनशैलीचे उदाहरण घालून देणे.
- अर्थक्रांती म्हणजे भारताला खर्या अर्थाने महासत्ता आणि जगातील आनंदी देश बनविणे.
..... चंद्रकांत वाजपेयी ( काका )
सौजन्याने : श्री अरुण फोके.
No comments:
Post a Comment